annasaheb patwardhan information in marathi : पुण्याच्या इतिहासात एक महत्वाचे स्थान महर्षि अण्णासाहेब पटवर्धन यांचे नक्कीच आहे, केवळ पुण्याच्याच इतिहासापुरते आहे असे म्हणणे खरे तर चुकीचेच ठरेल. राष्ट्राच्या इतिहासात अण्णासाहेबांचे स्थान प्रचंड महत्वाचे आहे असेच म्हणणे जास्त योग्य आहे. पण एखाद्या महत्वाच्या व्यक्तीस आपण खूपच लवकर विसरून गेलो असेच म्हणावे लागेल. ओंकारेश्वरापासून जाताना नदीपात्रात एक समाधी मंदिर दिसते ज्यावर “महर्षि अण्णासाहेब पटवर्धन समाधी” असे लिहिले आहे. एवढीच काय ती त्यांची ओळख आज बर्याच जणांना आहे. किंबहुना काही वर्षांपूर्वी माझीही तेवढीच त्यांच्याशी ओळख होती. आळंदी च्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात अण्णासाहेबांबद्ल प्रथम कळले आणि मग थोडा शोध घ्यायचा ठरवला. त्यात “महर्षि अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र, लेखक : अप्रबुद्ध” हे हाती लागले. त्याचे आधारे अण्णासाहेबांची थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न करत आहे.
महर्षि अण्णासाहेब पटवर्धन माहिती | Annasaheb patwardhan information in marathi | annasaheb patwardhan mahiti marathi

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ज्यांना गुरुस्थानी मानत ते म्हणजे महर्षि अण्णासाहेब पटवर्धन. त्यांचे मूळ नाव विनायक रामचंद्र पटवर्धन. भाऊसाहेब आणि जानकीबाई पटवर्धन यांच्या पोटी अण्णासाहेबांचा जन्म झाला. कसबा पेठेतल्या गुंड गणपतीचाच प्रसाद किंवा कृपा म्हणून जानकी बाईंच्या पोटी अण्णासाहेब जन्माला आले. जानकी बाई गणपतीची उपासना करत. नाना चित्त्राव यांच्याकडून त्यांनी गणेश उपासना जाणून घेतली होती. जानकीबाईंना साक्षात गणपतीने दर्शन दिले आणि पुढे त्यांच्या उपासनेचे फळ म्हणून अण्णासाहेबांचा जन्म झाला असे संगितले जाते. इसवी सन १८४७ साली मे महिन्यात विनायकरावांचा जन्म झाला. श्रद्धाळूपणा, चैनीचा तिटकारा, बुद्धिमत्ता, सामर्थ्य, अचाट स्मरणशक्ति, दयाळूपणा, तेजस्विता, प्रखर स्वाभिमान, राष्ट्राभिमान, निर्भयता अशा अनेक गुणांनी युक्त व्यक्तिमत्व अण्णासाहेब पटवर्धन होते. दुर्दैवाने आईचे सुख फार काळ काही त्यांना लभले नाही पण मृत्युपूर्वी त्यांच्या आईंनी त्यांची आणि गुंडाच्या गणपतची गाठ घालून दिली. त्याचे दर्शन घेणे, प्रदक्षिणा घालणे असा नित्यक्रम अण्णासाहेब तेंव्हापासून पळत असत.
त्याकाळातील पद्धतीप्रमाणे साधारण वयाच्या १४ व्या वर्षी अण्णासाहेबांचा विवाह शुक्रवार पेठेत असलेल्या लोणीविके दामले ह्यांच्या कन्येशी झाला. पुढे इसविसन १८६४ साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुण्यातील डेक्कन कॉलेज मध्ये प्रवेश केला. टिळक पंचांगाचे मूळ उत्पादक श्री केरूनाना छत्रे यांच्याशी अण्णासाहेबांची इथेच भेट घडली. अण्णासाहेबांचा ज्योतीर्गणिताचा अभ्यास केरूनानांकडेच झाला. अण्णासाहेब पंचांगाचा कायम उपयोग करत तो ह्यामुळेच!! ICS साठी इंग्लंडला जावे असे त्यांच्या मनात आले आणि त्या करिता त्यांनी वेगवेगळ्या भाषांचा अभ्यासही सुरू केला. पण हे परदेशी जाणे मात्र घडून आले नाही..
डेक्कन कॉलेज मधून १८६८ साली बी. ए. उत्तीर्ण होऊन डोक्यात असलेल्या अनेक कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याच्या हेतूने अण्णासाहेब मुंबईस आले. मुंबई मध्ये वैद्यकी शिक्षण घेण्यास अण्णासाहेबांनी सुरू केले. खरे तर विधीशाखेचे शिक्षण घेण्यास आलेले अण्णासाहेब एका प्रसंगामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या संपर्कात आले. आणि मग काय दोन्ही शाखांचा अभ्यास एकत्र सुरू झाला. इंग्रजी वैद्यकाचा अभयास सुरू केल्यावर आर्य वैद्यकाचा आभास करावा असे त्यांचे मत झाले. त्या साठी त्याकाळी पुण्यात प्रसिद्ध असलेले वैद्य, महादेवशास्त्री लागवणकर यांच्याकडे त्यांनी आर्यवैद्यकाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
मुंबईत असताना अनेक लोकांच्या संपर्कात आले. त्यातले एक म्हणजे विष्णुशास्त्री पंडित. अण्णासाहेबांनी काही काळ विधवा विवाहचे पुरस्कर्ते म्हणून पंडितांच्या जोडीने काम केले. विधवा विवाह शास्त्रोक्त आहे अथवा निषिद्ध आहे हे ठरवण्यासाठी त्यांनी प्राचीन वाङ्ग्मयाचा अभ्यासही केला. विधवापुनर्विवाह शास्त्रस सोडून नाही अशी त्यांची खात्री पटली आणि म्हणूनच ते त्याचे पुरस्कर्ते झाले असे म्हणता येऊ शकेल.
मेडिकल चे शिक्षण घेत असताना “ग्रँट मेडिकल कॉलेज जर्नल” चा पहिला अंकही अण्णासाहेबांनी स्वतः काढला. स्वतः आङ्ग्ल आणि आर्य वैद्यक असलेले अण्णासाहेबांचा लौकिकही खूप होता. स्मिथ नावाचे त्यांचे एक प्रोफेसर होते. त्यांना काही अडचण आल्यास अण्णासाहेबांच्या सल्ल्याने ते औषध उपचार करत. आङ्ग्ल वैद्यकाचा उणिवा त्यांना लक्षात आल्या आणि या जाणवून देण्यासाठी त्यांनी मोठी खटपट केली. हे सर्व सिद्ध करून दाखवण्यासाठी एक इंग्रजी आणि एक देशी दवाखानाही चालू केला. एकाच रोगाच्या काही रोगांसाठी इंग्रजी तर काही रोगांसाठी देशी पद्धतीचे औषध देऊन त्या रोग्यास बरे होण्यासाठी लागणारा वेळ शेकडा प्रमाणे पाहत असे. परंतु पुढे उद्भवलेल्या काही कारणांमुळे आणि मग मद्रासेस जाण्यामुळे ह्या सर्वाचा इतिश्री झाला, नाहीतर एक मोठी संस्था उभी राहिली असती. तसा त्यांचा मानस ही होता.
मुंबईस असताना एका वेळेस दोन डिग्री घेते येत नाही असा मुद्दा उपस्थित झाला आणि मग प्रथम कोणती घ्यावी ह्या विषयी वडिलांचा सल्ला अण्णासाहेबांनी घेतला. प्रथम वकिलीची घ्यावी कारण वकिली करून पैसा कमविता येतो. वैद्यकीवर पैसे कमावणे अयोग्य आहे असे वडिलांचे मत होते. ही त्यांची आज्ञा अण्णासाहेबांनी पुढे तशीच पाळली. वैद्यकीय सल्ल्याकरिता आलेल्या माणसाकडून त्यांनी आणलेले साधे फळही त्यांनी कधी घेतले नाही. इतकेच नाही तर घरात असे काही असल्यास ते घरात न ठेवता थेट ओंकारेश्वरास वाटण्याकरिता पाठवत असत.
लोकमान्यांचे स्नेही माधवराव नामजोशी यांना हाताशी घेऊन “किरण” आणि “Deccan Star” नावाचे इंग्रजी पत्र पुण्यात काढले. ह्याचे पुढे “केसरी” आणि “मराठा” मध्ये रूपांतर झाले. अण्णासाहेबांनी देशी कारखाने काढावे ह्या साठीही अनेक प्रयत्न केले. त्यांनी स्वतः पुढाकर घेऊन एक काच कारखानाही काढला. एका स्वीडीश माणसाच्या देखरेखेखाली हा कारखाना चांगले काम करू लागला आणि लवकरच भरभराटीसही जाईल अशी त्यांना आशा होती. पुढे ब्रिटिश सरकारनी असे काही कर लावले की काच माफक किमतीत देणे परवडणारे नव्हते. त्यातच काही कारणास्तव त्या स्वीडीश माणसास परत जावे लागले आणि कारखान्यास विश्रांती घ्यावी लागली… इतक्या सार्या गोष्टी, नाना प्रकारचे उद्योग करत असल्या मुळे त्यांना झोपेसाठी वेळही सापडत नसे. लोकांनी तर त्यांना कधी झोपलेले पहिलेच नव्हते !!
मुंबईत अण्णासाहेब जवळपास बारा वर्षे होते. ह्या काळात कधी मुंबई, कधी पुणे असे ते असत. ह्याच काळातच आळंदीच्या श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांशी त्यांचा संबंध आला. स्वामींनी आळंदीस मुक्तबाईचा मंडप बांधला. ज्ञानेश्वर महाराजांचा रथ घडवून घेतला आणि गावात रथयात्रा आणि प्रदक्षिणा सुरू केली. स्वामींवर अण्णासाहेबांची खूप श्रद्धा होती. महाराजांना भेटावयास जाताना अण्णासाहेब आपला श्रीमंती पोशाख, ऐटबाज, रेशीमकाठी धोतर सोडून सोपे धोतर नेसत. त्या खेरीज महाराजांसमोर जात नसत असेही संगितले जात.
अण्णासाहेबांच्या आयुष्यात एक महत्वाची घटना नक्कीच आपले लक्ष वेधून घेते. ते म्हणजे सालारजंग आणि वर्हाड प्रकरण. वर्हाड म्हणजे सोन्याची कुर्हाड !! कर्जफेडीच्या निमित्ताने निजामचा वर्हाड प्रांत इंग्रजांकडे होता.. कर्जाची फेडकरून जर वर्हाड प्रांत मोकळा करून घेता आला तर आपले मनोरथ पूर्ण करण्यास हे उत्तम कार्यक्षेत्र आहे असे अण्णासाहेबांनी ठरवले आणि त्या अनुषंगाने सालारजंग शी चर्चाही सुरु केली. सालारजंगासही हा विचार पटला आणि त्याने त्यास अंनुमतीही दिली.
ह्या संबंधी कोणत्याही प्रकारची बातमी ही पोष्टाने न पाठवता स्वतंत्र माणसांची डाक यंत्रणा उभी केली. हैद्राबादेत एक भली मोठी बँक काढून तिच्यामार्फत निजामसरकारास दहा बारा कोटीचे कर्ज देण्याचे ठरवले गेले. त्या बदल्यात अण्णासाहेबांनी वर्हाड चा कारभार आपल्या हातात घ्यावा असे ठरले!! एवढी मोठी गोष्टा लपून कसली राहते. निजाम सरकार मोठे कर्ज काढत आहे अशी बातमी सर्वत्र पसरली. राजकीय धोरण ह्यामागचे मात्र गुप्त राहिले. बातमी समजताच अनेक माणसे, जे हे पैसे देऊ शकतील ते पुढे आले. सालारजंग ची मुख्य अट अशी होती की ह्या कर्जास ब्रिटिश हमीशिवाय अथवा कोणत्याच प्रकारच्या ब्रिटिश माणसाची मध्यस्थी नको. म्हणजेच अण्णासाहेबांचा हेतु सिद्धीस जात होता हे दिसून येत होते. पण त्यास कोणी तयार होईना.
अण्णासाहेब म्हणजेच हायकोर्टाच्या तरुण वकिलाच्या नादी किती लागावे, किती विश्वास ठेवावा हे सालारजंगास उमजेना म्हणून सर्व प्रकारची खटपट चालू असताना अण्णासाहेबांची परीक्षा घेण्याचे त्यांनी ठरवले. बँकेचे होईल तेंव्हा होईल पण काही कामाकरिता आताच्या आता दोन कोटी रुपये पाहिजेत अशी मागणी त्यांनी समोर ठेवली. अण्णासाहेबांना मुंबईस ही तार मिळताच डॉक्टर स्मिथ, आपले गुरु ह्यांच्या मध्यस्थी ने काही तासातच त्यांनी “दोन कोटी” रुपये उभे केले आणि हैदराबाद ला तार पाठवली “दोन कोटी रुपये तयार आहेत, कोठे आणि कसे पाठवू.” अण्णासाहेबांची फजिती होणार अशी समजूत सालारजंग ची होती . त्यात अशी तार आल्याने तो एकदम चकित झाला आणि “तूर्तास नको मागाहून कळवतो” अशी उलटी तार केली. ह्या घटनेमुळे त्याचा अण्णासाहेबांवर विश्वास बसला आणि फ्रेंच बँकेमार्फत बारा कोटीचे कर्ज काढयचे ठरवले. हा खेळ पण अण्णासाहेबांना चांगलाच भोवला. स्मिथ ची दलाली आणि थोड्याच वेळेसाठी काही होईना दोन कोटी कर्जाची व्याजवरील रक्कम सुमारे २ – ४ लाख रुपये झाली. हे कर्ज त्यांना अखेरपर्यंत फेडावे लागले.
मध्यंतरीची च्याकाळात मद्रासयेथील व्यंकट परमाळ नावाच्या राजाने काही कामा करता अण्णासाहेबांस संधान धाडले. मद्रास चे काम करण्यासाठी अण्णासाहेबांनी प्रस्थान ठेवले. वाटेत सालारजंगास भेटून पुढे जावे असे ठरवून मुंबईहून निघाले. पुण्यात येऊन आळंदीस जाऊन प्रथम स्वामी महाराजांचे दर्शन घेण्याचे ठरवले. स्वामीच्या आणि अण्णासाहेबांच्या ह्या भेटी मध्ये “मद्रासेस जाऊ नये” असे महाराजांनी संगितले. !! “आपण जाणारच”असे अण्णासाहेबांनी त्यावर संगितले. “ बरं..जसा जाशील तसा येशील” एवढेच म्हणून येताना कंचीस जाऊन ये असेही स्वामींनी संगितले.
सगळ्या प्रकारच्या खटाटोपातून हे सर्व प्रकरण थडीस लागले असे वाटत असतानाच हैदराबादहून सालारजंगच्या आकस्मिक मृत्युची तार आली. इमारत उभी राहत असतानाच पाया ढासळून इमारताच पडली. हिम्मत न हारता मद्रास चे काम उरकण्याच्या मागे अण्णासाहेब लागले. त्यातून काहीतरी उभारणी मिळत असतानाच व्यंकट परमाळचा ही मृत्यु झाला आणि ते ही कारस्थान मोडून पडले !!
अण्णासाहेबांचा मुळातच स्वभाव श्रद्धाळू होता. स्वधर्म आणि स्वसंस्कृतीवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. त्या काळाला अनुसरून ईश्वरसत्ता, ईश्वरी सामर्थ्य, तप, उपासना या गोष्टींवर त्यांची अढळ अशी श्रद्धा होती. त्याचे त्यांना अनेक अनुभवही आल्याचे ते सांगत असत. स्वराज्याच्या साधनेत ईश्वरी सामर्थ्याची जोड मिळावी ह्या करता त्यांनी अनेक प्रयत्न केले. गणेशाची उपासना तर करत पण वर सांगितल्याप्रमाणे त्यांचा संबंधआळंदीच्या स्वामींशी आला तो कायमचाच राहिला. स्वामींनीही त्यांना अनेक प्रकारचे अनुभव दिले. काबुल ची लढाई एका कागदाच्या लहानशा भोकातून बसल्याजागी दाखवली. स्वामींच्या सामर्थ्याचीत्यांना प्रचिती आली आणि त्यांची स्वामींवरची निष्ठा अजूनच वाढत गेली. स्वामींनी त्यांना जाणवून दिले की हिंदूस्थांनाची उन्नती पैशावाचून अडलेली आहे माणसावाचून नाही. ह्या सर्व घटनांनंतर अण्णासाहेबांच्या जीवनाच वेगळा काळ सुरू झाला असेच म्हणता येईल.
वैद्यकीवर पहिल्यापासून पैसे मिळवीत नव्हतेच, आणि कोणासहीसल्ला द्यावयास तयार असल्यामुळे त्यांच्या मागे पुष्कळ व्याप लागला असेच म्हणावे लागेल. पुढे पुढे हे इतके वाढत गेले की वीस – वीस तास हा कार्यक्रम चाले. पहाटे सहा ते रात्री दोन असा हा कार्यक्रम असे. पण कधीही त्रासलेले किंवा थकलेले कोणी त्यांना पहिले नाही. हसत खेळत थट्टा मस्करी करत उपाय संगत असे. हे सगळे चालू असताना म्यून्सीपालिटी, सार्वजनिक सभा, राष्ट्रीय चालवली, अशा नाना गोष्टीही चालूच होत्या. म्यून्सीपालिटीत १९१२ पर्यन्त निवडून येत असत. पुण्यात असेपर्यंत अशी कोणतीच चळवळ झाली नसेल जिचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध अण्णासाहेबांशी आला नसेल. पान मांडून जेवणे त्यांना ठाऊकच नव्हते असे म्हणावे लागेल. आपली सर्वे कामे आटोपल्यावर रात्री दोन वाजता ते साधी भाजी दशमी खात असत. पुढे पुढे तर ते ही बंद होऊन पाव किलो शेंगदाणे घेऊन खाणे असाच त्यांचा आहार असे. माणसांची सतत वर्दी असे.विश्रांतीसाठी निजलेले त्यांना कोणी पहिले नाही किंवा त्यांच्या घरचा दरवाजा कधी बंद पहिलं नाही. कोणी सल्ल्यासाठी येत तर कोणी शास्त्रीय बाबी विचारत, कोणी प्रापंचिक भानगडी घेऊन येत तर कोणी वैयक्तिक तक्रारी घेऊन, कोणी शंकांचे समाधान करण्यास येत तर कोणी केवळ दर्शनास. ह्या सर्व गोष्टी चालू असताना पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याची कल्पनाही भाऊसाहेब रंगारी, काशीनाथ ठकुजी इत्यादि गृहस्थाना धरून यशस्वीपणे राबवली. सूरत कॉंग्रेस प्रकरण, प्लेग चळवळ अशा अनेक लहान मोठ्या चळवळींना त्यांचा पाठिंबा असे. राष्ट्रीय पक्षाची एखाधि महत्वाची सभा असली तर अण्णासाहेब अध्यक्ष असत.
लोकमान्य टिळक अण्णासाहेबांना आपले गुरु मानत. तसेच लोकमान्यांवरही त्यांचा लोभ होता. त्यांची किर्ति वाढत राहावी म्हणून अण्णासाहेब ईश्वराची प्रार्थनही करत. लोकमान्यही घरच्याप्रमाणे त्यांचाच सल्ला घेत असत. मंडालेहून सुटून आले तेंव्हा टिळक प्रथम गजाननाचे दर्शन घेऊन अण्णासाहेबास नमस्कार करण्यास गेले. आपल्या गीता रहस्याची पहिली प्रत पांडुरंगास, दुसरी गजननास आणि तिसरी आण्णासाहेबांना दिली. त्या वरूनच टिळकांचे आणि अण्णासाहेबांचे संबंध कसे होते हेच कळून येते.
प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज हे आपल्या शेवटच्या काळात पुण्यास आले. इथे आल्यावर त्यांची तब्बेत बिघडली. अण्णासाहेब पटवर्धन यांनी महाराजांना तपासून औषधे दिली. महाराजांच्या शेवटच्या काही दिवसामध्ये तर दिवसातून तीन वेळा अण्णासाहेब त्यांना बघायला जात असत.
स्वतःचा कणभर विचारही न करता, भारतावर्षाच्या भविष्याची चिंता मात्र अण्णासाहेब कायम करत. असेच करत करत आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दुसर्याकरिता झिझवीत इसविसन १९१७ साली फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेला, म्हणजेच माघ शु एकादशीच्या दिवशी प्रातः काली त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. हा हा म्हणता म्हणता बातमी सर्वदूर पसरली. लोकांच्या झुंडी वाड्यापाशी जमू लागल्या. त्यांच्या दर्शनास हिंदू – अहिंदू, स्त्री – पुरुष, सर्व दर्जाची लोकं जमली. अण्णासाहेबांचा वाडा हा शनिवार वाड्याच्याच्या मागच्या बाजूस होता . ठरल्या प्रमाणे दुपारी त्यांना पालखीत बसवून यात्रा निघाली. शनिवार वाड्यास वळसा घालून रामेश्वर ..चित्राशला…मोदीचा गणपती…गायकवाड वाडा…शनवरचा मारुती आणि शेवट ओंकारेश्वर ह्या मार्गाने येऊन सध्या असलेल्या समाधीच्या ठिकाणी यात्रेचा शेवट झाला. मग तिथे लोकमान्यांचे छोटे भाषण झाले , विरुपाक्ष मठाचे आचारी बोधांनंद भारती यांनी ही थोडे भाषण केले आणि सर्वांनी त्या दिव्य शरीराचा सर्वांनी निरोप घेतला.
प्रचंड सामर्थ्य, त्याला दैवी जोड लाभलेल्या अण्णासाहेब पटवर्धन ह्यांचे हे चरित्र. अशी माणसे होती म्हणूनच हे पुण्यक्षेत्र होऊ शकले.
सौरभ मराठे
माघ शु एकादशी
१२.०२.२०२२