maharshi karve information in marathi : व्यासपीठावर बसलेल्या डाॅ. राजेंद्रप्रसादांची नजर रांगेतील एका खुर्चीकडे वारंवार जात होती
चटकन उठावं, व्यासपीठाच्या पाय-या उतरून पहिल्या रांगेतलया त्या खुर्चीपर्यंत जावं, त्या खुर्चीवर बसलेल्या ‘त्या तपस्वी महर्षीला वाकून वंदन करावं’* असं त्यांच्या मनात पुनःपुन्हा येत होतं.
पण हे करण्यासाठी नेमका कोणता क्षण पकडावा, हे त्यांच्या लक्षात येत नव्हते.
त्या समारंभात कुठलाही व्यत्यय न येता राष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठा सांभाळून त्यांना हे सारं करायचं होतं
समारंभ होता पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात. महाविद्यालयाने 75 वर्षांची वाटचाल पूर्ण केल्याबद्दल एक मोठा समारंभ आयोजित केला होता, त्यासाठी भारताचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महर्षी धोंडो केशव कर्वे माहिती | maharshi karve information in marathi | Maharshi Dhondo Keshav Karve Information in Marathi

डाॅ. राजेंद्रप्रसाद भाषणासाठी उठले. पण ते जेव्हा माईककडे न जाता, व्यासपीठाच्या पाय-या उतरू लागले तेव्हा मात्र सारेच बुचकळ्यात पडले. *राष्ट्रपती खाली उतरले. चालत चालत पहिल्या रांगेतलया त्या विशिष्ट खुर्चीपर्यंत गेले आणि तिथे बसलेल्या त्या वयोवृद्ध व्यक्तीला वाकून नमस्कार केला त्यांनी!
‘ती व्यक्ती कोण आहे,’ हे तिथे हजर असलेल्या प्रत्येकाला माहित असल्यानं, तमाम पुणेकर जनतेने राष्ट्रपतींच्या या कृतीला पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा गजर करून मनमुराद दाद दिली. कारण, ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसंरं कुणीही नव्हतं तर साक्षात अण्णा होते. अण्णा म्हणजेच ‘ महर्षी धोंडो केशव कर्वे’!
खरेखुरे क्रियाशील सुधारक! महर्षी कर्वे म्हणजे सेवामुर्ती. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर हा आधुनिक व्यास आपल्या शिक्षण संस्थांना देणग्या मिळवण्यासाठी इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, जपान या देशाच्या दौ-यावर निघाला होता. आगबोटीच्या खडतर प्रवासाने. हे पाहिलं की त्यांचं शिक्षण-प्रेम आणि सामाजिक सुधारणां बद्दलची त्यांची तळमळ लक्षात येते. खरंतर महर्षी कर्वे केवळ ‘वाचावीर’ नव्हते तर ते ‘कर्मवीर’ होते
आणि म्हणूनच ‘आधी केले मग सांगीतले’ या न्यायाने त्यांनी आधी एका विधवेशी विवाह केला आणि मगच समाजाचा प्रचंड विरोध पत्करूनही विधवा विवाहासाठी विचार जागृतीचे अभियान चालू केले.
महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवणा-या या महर्षीने पित्याच्या वात्सल्याने आपल्या प्रत्येक शिक्षण संस्थेचे भरण-पोषण केले होते.
फर्ग्युसन कॉलेजात लो.टिळक गणिताचे अध्यापन करीत असत. चळवळींमुळे त्यांना फर्ग्युसन कॉलेज मधून बाजूला व्हावे लागले, तेव्हा ती जागा महर्षी कर्वेंना मिळाली. टिळकांचा वारस म्हणून कर्वे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये सलग 23 वर्ष गणिताचं अध्यापन केलं. पुण्यातल्या एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे ते संकल्पक, संस्थापक, संघटक होते, आपल्या शिक्षण संस्थांवर अण्णांची किती प्रचंड माया होती आणि त्या संस्थांच्या उभारणी साठी केवढी धडपड करीत होते ते पुढील प्रसंगावरून लक्षात येते.
सुप्रसिद्ध उद्योगपती सर विठठलदास ठाकरसी यांना भेटून ‘काही देणगी मिळतेय कां’ हे पाहण्यासाठी महर्षी एकदा त्यांच्या पुण्यातल्या बंगल्यावर गेले होते. पायी चालत. पर्वतीच्या बाजूला त्यांचा बंगला.
पण त्या काळात 10-15 किलोमीटर चालण्याचं कर्वे यांना काहीच वाटत नसे.
अगदी एक रुपया जरी देणगी मिळणार असेल, तर अण्णा 5-6 मैल जाऊन तो रुपया घ्यायला तयार असत!!
संस्था उभ्या राहतात, त्या अशा भगीरथांमुळे!
ठाकरसींना अण्णा भेटले, चर्चा झाली. ठाकरसींनी सुरुवातीला एक लाख देण्याचे आश्वासन तर दिलेच, पण पुढे अधिकाधिक देणगी देण्याचा संकलपही व्यक्त केला.
अण्णांना खूप बरं वाटलं!
खुश होऊन ते परत निघाले. ठाकरसी म्हणाले, “कसे जाणार परत घरी “
“चालत”!! अण्णा म्हणाले. “म्हणजे? आलात कसे अण्णा?” ठाकरसींना विचारलं..
“कसे म्हणजे? चालतच आलोय मी?” अण्णांच हे उत्तर ऐकून ठाकरसी अवाकच झाले. सात-आठ मैल चालत आलेले अण्णा पुन्हा सात-आठ मैल, भर उन्हात चालत जाणार होते!
“नाही नाही अण्णा, तुम्ही चालत जाउ नका, हे दोन रुपये घ्या आणि टांग्याने घरी जा!” ठाकरसींना बजावले.
” बरं ! बरं ! “
असं म्हणून अण्णा उठले आणि बाहेर पडले. पण ठाकरसींना चैन पडेना.
‘एकेका रूपयासाठी धडपडणारे अण्णा टांगयासाठी दिलेले दोन रूपये सुद्धा संस्थेच्या मदत निधीत भरतील आणि स्वतः चालत जातील,’ असं त्यांना राहून राहून वाटत होतं! म्हणूनच त्यांनी ड्रायव्हरला बोलावले आपल्या आणि त्याला सांगितले,
” पटकन जा, आत्ता जे गृहस्थ आपल्या बंगलयातून बाहेर पडलेत, ते टांगयाने जात असतील तर परत ये. पण जर ते चालत जातांना दिसले, तर त्यांना आपल्या गाडीतून एरंडवणयाला सोडून ये.”
ड्रायव्हरने लगबगीने गाडी काढली, रस्त्यावर आणली. थोडेसे अंतर जातो न जातो, तोच त्याला दिसलं, अण्णांची कृश मूर्ती रस्त्यावरून सावकाश चालत एरंडवण्याकडे निघाली होती !
मला सांगा, राष्ट्रपती डाॅ. राजेंद्रप्रसाद अशा ऋषितुलय व्यक्तीला खुर्चीवरून उठून व्यासपीठ सोडून नमस्कार करायला आले तर त्यात नवल ते कसलं ! त्यावेळी महर्षी कर्वे याचं वय होतं 101 वर्षे!!* नुकताच त्यांना “भारतरत्न” पुरस्कार मिळाला होता. बर्लिन मध्ये साक्षात आईनस्टाईनला भेटणारा हा पहिला महाराष्ट्रीयन महापुरूष!!…
चला तर या महान शिक्षणसम्राटाला आपण मानाचा मुजरा करूया.
दिप्ती जोशी.
एकच अभिलाषा असो आम्हाला!*
“आमचंही जीवन असंच सुगंधित बनावं”